धक्कादायक!अल्पवयीन मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार; दोन्ही आरोपीही अल्पवयीन, किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना !
पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमे तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक कृत्य करणे, तिच्या शीलभंगास कारणीभूत ठरणे तसेच एकाहून अधिक व्यक्तींचा सहभाग असणे, अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.
दोन्ही अल्पवयीन आरोपींची सुधारगृहात रवानगी
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बालन्याय अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील प्रक्रिया राबवून आरोपींना बुलढाणा येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पीडित मुलीची आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, बालकल्याण समितीमार्फत समुपदेशन व संरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर आवश्यक पुरावे योग्य व कायदेशीर पद्धतीने संकलित करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
