धक्कादायक! चार महिला चुकीचे काम करतांना करतांना पकडल्या! मलकापूरहून बुलढाण्याकडे ऑटोने येत होत्या..ढाब्यासमोर पोलिसांनी घातली झडप! मेन सुत्रधार जळगावची महिला...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आतापर्यंत गांजा तस्करीच्या प्रकरणांमध्ये पुरुषांची नावे समोर येत असताना, आता बुलढाणा जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या चार महिलांना पोलिसांनी पकडले आहे. मलकापूरहून बुलढाण्याकडे गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४ किलो २ ग्रॅम गांजा आणि तीन मोबाइल असा एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नळगंगा ढाब्यासमोर पोलिसांची कारवाई!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी महिला मलकापूरहून बुलढाण्याकडे गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मलकापूर-मोताळा मार्गावरील नळगंगा ढाब्यासमोर, डिडोळा शिवारात पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी एका ऑटोमध्ये गांजा बाळगून वाहतूक करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी त्यांच्याकडून ४.००२ किलो गांजा, ज्याची किंमत २ लाख १०० रुपये आहे, तसेच १ हजार ५०० रुपये किमतीचे तीन मोबाइल जप्त केले. अशा प्रकारे एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

चार महिलांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा

या प्रकरणात भारती अनिल बरडे (वय ४०), मंगला गणेश माळी (वय ५०), अरुणा देविदास पुरणे (वय ४०) आणि आशा श्रीकृष्ण बरडे (वय ४०), सर्व राहणार बुलढाणा शहरातील जुनेगाव परिसर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०३/२०२६ नुसार अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गांजा कुणाकडून आणला? जळगाव जिल्ह्यातील महिलेचा शोध

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलांनी हा गांजा जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथील योगेश जैस्वाल यांच्या पत्नींकडून आणल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या महिलेचा शोध सुरू असून, गांजाच्या पुरवठ्यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.