धक्कादायक! शेतातील मचानीवरून पडल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू; रोहीणखेड येथील घटना....

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात जागलीवर गेलेल्या शेतकऱ्याचा झोपेत असताना मचाणावरून पडल्याने मृत्यू झाला. ५ डिसेंबरच्या सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली. गजानन जगदेव काटे (५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 
रोहिणखेड येथील रहिवासी असलेले गजानन काटे यांची शेती गट नंबर २३२ मध्ये आहे. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ते पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे काटे शेतातील मचाणावरून जावून झोपले. ४ डिसेंबरच्या रात्री झोपेत असताना मचाणावरून जमिनीवर कोसळले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृताचा मुलगा राहूल काटे ५ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता शेतात गेला असता वडिलांचा मृतदेह आढळून आला. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.