धक्कादायक! जिल्ह्यात धावत्या वाहनाच गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारी टोळी सक्रिय! मेहकर तालुक्यात एजंटला रंगेहात पकडले
Apr 19, 2025, 09:57 IST
डोणगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाशीम जिल्ह्यातून गर्भवती महिलेस स्विफ्ट डिझायर कारमध्ये घेऊन डोणगाव शिवारात येत असतानाच हिंगोली जिल्ह्यातील एका एजंटला बुलढाण्यातील पीसीपीएनडीटीच्या पथकाने पाठलाग करून रंगेहात पकडले आहे. शेलगाव देशमुख शिवारात ही कारवाई करण्यात आली. गजानन विठ्ठल वैद्य असे आरोपीचे नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या माझोडचा रहिवासी आहे. या प्रकरणी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवून आरोपी वैद्य याला अटक केली.
बेकायदा गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारी टोळी जिल्हा व लगतच्या जिल्ह्यात सक्रिय आहे. आहे. त्यामुळे बुलढाण्याचा पीसीपीएनडीटी विभाग दक्ष झाला आहे. दरम्यान या गर्भलिंग निदानासंदर्भात माहिती समजताच सापळा रचण्यात आला. त्यासाठी डमी महिला तयार करण्यात आली.
आरोपी गजानन वैद्य याने वाशीम जिल्ह्यातील कुकसा फाट्यावरून एमएच-४९-एएस ६९६६ क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीमध्ये महिलेस बसवून डोणगावकडे निघाला. मात्र, मध्येच पथक मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने वाहन शेलगाव देशमुख मार्गाने वळविले. अखेर पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता चार सेफ्टी ग्लोव्हज, पाच नग ब्लड कलेक्शन बॉटल, डिस्पोजल सिरिन्ज असे साहित्य आढळून आले. गर्भलिंग निदान करण्याचे उपकरण आणि सर्व साहित्य वाहनात उपलब्ध असते. धावत्या वाहनातच ही टोळी चाचणी करते. नंतर एखाद्या ठराविक जागेवर नेऊन तेथे गर्भपात केला जातो. पीसीपीएनडीटी पथकातील ॲड. वंदना तायडे, पंच गजानन शेवाळे, ज्ञानेश्वर मुळे व संतोष माळोदे यांनी या कारवाईसाठी सहकार्य केले. घटनेचा अधिक तपास अशोक गाढवे करीत आहेत