धक्कादायक! जिल्ह्यात पाच महिन्यांत २७ खून, ४४ जणांवर जीवघेणे हल्ले! अनैतिक संबंध, जमिनीचे वाद, व्यसनाधीनता आणि क्षुल्लक कारणांमुळे वाढत आहे गुन्हेगारीचा आलेख..

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चढताच असून जानेवारी ते मे २०२५ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत २७ जणांचे खून झाले असून, ४४ जणांवर जीवघेणे हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, या घटनांचा तपास पूर्ण करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असली, तरी कायदा-सुव्यवस्थेला आव्हान ठरावणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ हाेत असल्याचे चित्र आहे. 

खुनांच्या घटनांमागे प्रमुख कारणे म्हणून अनैतिक संबंध, संपत्तीचे वाद, हुंड्याची मागणी, घरगुती भांडणे, व्यसनाधीनता आणि जमिनीचे वाद आढळून आले आहेत. विशेषतः मद्यप्राशनामुळे उद्भवलेल्या वादांमधून हिंसक घटना घडत असल्याचे अनेक प्रकरणांतून समाेर आले आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात नशेखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गावागावात अवैध दारू विक्रीचे रॅकेट सक्रिय असून, पोलिसांकडून त्यावर मोहीम राबविली जात आहे. मात्र तरीही तरुणाई व्यसनाधीन होत असल्याने गंभीर गुन्ह्यांच्या घटनांना चालना मिळत आहे. 

पाच महिन्यांतख तब्ब्ल २७ खून!

बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत तब्बल २७ खून झाले आहेत. गतवर्षी याच कालावधीत २३ खुनांच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. यावर्षी हा आकडा वाढला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात पाेलिसांची कारवाई सुरू असली तरी गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे चित्र आहे.