औरंगजेबाचा पुळका आलेल्या अबु आझमीचा चिखलीत शिवसैनिकांनी जाळला पुतळा..!..तर अबु आझमीचे तोंड काळे करू; शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप यांचा इशारा...
Mar 4, 2025, 20:06 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समाजवादी पक्षाचा नेता आमदार अबु आझमीचा चिखलीत पुतळा जाळण्यात आला. औरंगजेबाचा पुळका आलेल्या अबु आझमीने स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने औरंगजेबाच्या काळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता असे विधान केले होते. शिवाय औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात असल्याचा दावा देखील त्याने केला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अबू आझमी चा निषेध करण्यासाठी चिखलीत शिवसैनिकांनी त्याचा पुतळा जाळला. शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले..
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, गोपी लहाने, कैलास भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छत्रपतींच्या इतिहासाचा अपमान खपवणार नाही; शहर प्रमुख विलास घोलप यांचा इशारा..
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्य पूर्ण आणि न्यायप्रिय नेतृत्वामुळे देशात स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी स्वराज्याची स्थापना केली. मात्र या स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब होता. औरंगजेबाने उभ्या हयातीत स्वराज्य संपवण्यासाठी शेकडो वेळा कटकारस्थान रचले. अशा औरंगजेबासारख्या अत्याचारी शासकाला मोठे करण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी करत आहे,हे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्यासाठी अभिमानाचा आहे, छत्रपतींच्या इतिहासाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. अबू आझमीने त्याचे विधान मागे घ्यावे अन्यथा त्याचे तोंड काळे करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे विलास घोलप म्हणाले.