जळक्यांना आवरा हो! बेलुरा शिवारात ज्वारीच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे ९० हजारांचे नुकसान; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; तब्बल ५० पोती ज्वारी जळून खाक
May 11, 2026, 09:08 IST
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील बेलुरा शिवारात अज्ञात इसमाने ज्वारीच्या गंजीला आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना ९ मेच्या रात्री उघडकीस आली. या आगीत तब्बल ५० पोती ज्वारी जळून खाक झाली असून शेतकऱ्याचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलुरा येथील गट क्रमांक ६५ मधील शेतात बटाईतदाराने ज्वारीची सोंगणी करून मोकळ्या जागेत गंजी लावून ठेवली होती. दरम्यान, ९ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावली. आग भडकताच संपूर्ण गंजी जळून खाक झाली. यात सुमारे ५० पोती ज्वारीचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. याप्रकरणी संदीप विष्णू देवचे यांनी जलंब पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक १४६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (एफ) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरवाडे करीत आहेत.
दरम्यान, ऐन हंगामात झालेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.