ती बकऱ्या चारत होती, तेवढ्यात तो आला अन् तिच्यासोबत नको ते केले! आता भोगावी लागणार कर्माची फळे...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी ३५४ (अ) व ३५४ (ड) अशा दोन कलमांतर्गत प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार अशी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षा आरोपीस एकाचवेळी भोगावयाच्या आहेत.

शंकर रामभाऊ जाधव (२१) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीस कलम ३५४ 'अ' मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास तसेच तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा असा निर्णय देण्यात आला. तसेच ३५४ 'ड' कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, तीन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. एका गावातील १५ वर्षीय मुलगी ९ सप्टेंबर २०२१ रोजी लहान बहिणीसोबत बकऱ्या चारण्याकरिता गेली होती. यावेळी त्याठिकाणी आरोपी शंकर जाधव दुचाकीवर आला. त्याने मुलीचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता आरोपीने शिवीगाळ केली. त्यावेळी त्याठिकाणी गावातीलच एक महिला हजर होती. तिनेही आरोपीस हटकले. घाबरून मुलगी घराकडे निघाली असता तिचा पाठलाग केला. पीडित मुलीने ही घटना आई, वडिलांना सांगितली. या प्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी विविध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी तपास करून बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे हा खटला चालविण्याकरिता विशेष सरकारी वकिल ॲड .संतोष खत्री यांच्याकडे सोपविण्यात आला. खत्री यांनी सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले.
सरकारी वकिलांनी सिद्ध केला गुन्हा
विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी न्यायालयासमोर नोंदविलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून पीडिता ही अल्पवयीन असल्याची तसेच आरोपीने पीडितेचा विनयभंग करून तिचा पाठलाग केल्याबाबतची बाब सिद्ध केली. प्रखर युक्तीवाद केल्यानंतर व न्यायालयासमोर उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी २० डिसेंबर रोजी शंकर जाधव याला शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ शांताराम जाधव यांनी सहकार्य केले.