कॉलेजला जाते सांगून सकाळी घराबाहेर पडली, ती परतलीच नाही! चिखली तालुक्यातील १८ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; वडिलांना अपहरणाचा संशय, अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल!

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कॉलेजला जात असल्याचे सांगून सकाळी घराबाहेर पडलेली १८ वर्षीय विद्यार्थिनी सायंकाळपर्यंत घरी परतलीच नसल्याची घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ नोव्हेंबर रोजी घडली. नातेवाईकांसह संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही मुलीचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर चिंताग्रस्त वडिलांनी अंढेरा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चिखली येथे कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळचे ५ वाजले तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. वडिलांनी नातेवाईकांकडे तसेच परिसरात मुलीचा शोध घेतला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलीला पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत वडिलांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दिली.

बेपत्ता विद्यार्थिनीची उंची अंदाजे पाच फूट असून, रंग गोरा आणि केस लांब आहेत. घरातून निघताना तिने जीन्स आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता, तर पायात बूट होते. या वर्णनाची विद्यार्थिनी कोणाला आढळल्यास अथवा तिच्या ठावठिकाण्याबाबत काही माहिती मिळाल्यास अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीचे खरोखर अपहरण झाले आहे की तिच्या बेपत्ता होण्यामागे अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.