

लाज सोडली...! जन्मदात्या आईला जिवंत पेटवले; संग्रामपूर तालुक्यातील घटना.
Feb 10, 2025, 08:41 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईलाच जिवंत पेटविल्याची घटना काल, ९ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे घडली. भाजलेल्या मातेला शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. दरम्यान, या खळबळजनक घटनेमुळे समाजातून चांगलाच संताप व्यक्त आहे.
पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील रहिवासी असलेला गौरव अरुण देशमुख हा दारुच्या आहारी गेलेला आहे. दरम्यान, काल ,९ फेब्रुवारी रोजी दारुच्या नशेत तर्रर्र असलेला गौरव स्वतःच्या घरी गेला. घरात पाय ठेवताच 'आई तू घातलेली साडी मी आणलेली असून आताच मला काढून दे, नाही तर मी तुला आग लावुन पेटवून देईल', असे म्हणाला. दारुच्या नशेत असलेल्या गौरवला आई मीनाबाईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगात राक्षस संचारलेल्या गौरवने आईचे काही एक न ऐकता तीच्या पेटीकोटला आग लावुन तीला जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मीनाबाईचे पाय, तळपाय भाजले असून त्यांना उपचारार्थ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
या प्रकरणी अरुण देशमुख यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी गौरव देशमुख याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम १०९ (१), ३५२, ३५१ (२), (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बोपटे हे करीत आहेत.