लाज सोडली! ६० वर्षाच्या नराधमाने १२ वर्षाच्या मुलीसोबत नको ते केले; गावातील महिलांनी दिला बेदम चोप! व्हिडिओ व्हायरल.. बुलडाणा तालुक्यातील घटना
Updated: Jun 19, 2025, 09:57 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):घरात एकटी असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १७ जून रोजी बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात घडली. या प्रकरणी ६० वर्षीय आरोपीविरोधात बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतप्त महिलांनी आरोपीचा शोध घेऊन चोप दिला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील व्यवसायिक सुनील बुरड (वय ६०) याने बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात कथित सावकारकी व्यवहारातून शेती आपल्या नावे करून घेतली होती. या व्यवहारानंतर तो १७ जून रोजी त्या गावात गेला. व्यवहार केलेल्या व्यक्तीच्या घरी पोहोचल्यावर, त्याच्या घरात १२ वर्षीय मुलगी एकटीच होती. बुरडने तिला तिच्या आई-वडिलांविषयी विचारणा केली आणि त्यानंतर अचानक तिला जवळ ओढून विनयभंग केला पीडित मुलगी घाबरली आणि आरडाओरड करू लागली.
त्यामुळे आरोपी सुनील बुरड घाबरून तिथून मोटारसायकलवरून पळून गेला. पीडित मुलीने ही घटना आपल्या आजी आणि वडिलांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम ६ सह इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकुळसिंग राठोड करीत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावातील महिलांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.