१० वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार; आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास; खामगाव जिल्हा न्यायालयाचा निर्णय...
Dec 24, 2025, 14:22 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ ने आरोपी योगेश संतोष आवारे (रा. टेंभुर्णा) यास दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास व ८० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.सदर गुन्हा ०४ जून २०२२ रोजी खामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आला होता. आरोपीने घटनेच्या वेळी अवघ्या १० वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा गंभीर आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित करून २८ जानेवारी २०२५ पासून साक्ष नोंदविण्यास सुरुवात केली.
सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडित बालक, त्याची आई, वैद्यकीय अधिकारी, दुकानदार, जप्ती पंचनाम्याचे साक्षीदार तसेच घटनास्थळावरील साक्षीदारांचा समावेश होता. सर्व साक्षीदारांची साक्ष विश्वासार्ह व ठोस ठरली.
तपासादरम्यान तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी व अमोल कोळी यांनी निष्पक्ष व वस्तुनिष्ठ तपास केला. पीडित बालकाच्या जातीचे प्रमाणपत्र संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून निर्गमित असल्याचा ठोस पुरावाही न्यायालयात सादर करण्यात आला.न्यायालयाने ठोठावलेल्या ८० हजार रुपयांच्या दंडापैकी ७५ हजार रुपये पीडित बालकास देण्याचे आदेश दिले आहेत.
कलमनिहाय सुनावलेली शिक्षा :
कलम ४, पोक्सो अधिनियम : २० वर्षे सश्रम कारावास व २५,००० रुपये दंड
कलम ६, पोक्सो अधिनियम : २० वर्षे सश्रम कारावास व ३०,००० रुपये दंड
कलम ३(२)(५), अ.जा.ज.अ.प्र.का. : २० वर्षे सश्रम कारावास व २५,००० रुपये दंड
कलम ५०६, भादंवि : ६ महिने कारावास व ५,००० रुपये दंड
सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या असून आरोपी हा ०८ जून २०२२ पासून बुलढाणा जिल्हा कारागृहात असल्याने, त्या कालावधीचा लाभ शिक्षेमध्ये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता उदय आपटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंदा शिंदे व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर काळे यांनी कोर्ट पैरवीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
