खळबळजनक! तरुणीला लॉजवर बोलावून केला "तसला" प्रयत्न; तरुणीने विष प्राशन केले; शेगावची घटना...

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावात खळबळजनक घटना समोर आली आहे. तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न २३ वर्षीय तरुणाने केला. या प्रकारातून तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ह्या प्रकाराने भेदरलेल्या तरुणाने तरुणीला रुग्णालयात दाखल केले मात्र पोलिसांत तक्रार दिली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.. उपचारातून सावरल्यानंतर आता या तरुणीने पोलीस स्टेशन गाठले असून आपली आपबिती पोलिसांच्या कानावर टाकली आहे. या घटनेमुळे शेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे..

  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका भागात राहते. पीडित तरुणीचे वय २० वर्ष आहे. कॉमन फ्रेंड च्या माध्यमातून आरोपी मयूर शालिग्राम खिरोडकर याची तरुणीसोबत ओळख झाली. मयूर तरुणीला व्हाट्सअप वर मेसेज पाठवायचा. पीडित तरुणी कडून मयूरला संपर्क नाकारण्यात आल्यानंतर त्याने सुरुवातीला स्वतःला इजा करण्याच्या धमक्या दिल्या, त्यानंतर आरोपी मयूरने तरुणीला भेटायला बोलावले..
लॉजवर नेले अन्...
  दरम्यान दोघांमधील हा संपर्क वाढत गेला. आरोपी मयूरने पीडित तरुणीला शेगाव येथील एका लॉजवर नेले,तिथे मयूरने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.तरुणीकडून नकार आल्यानंतर त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने धक्का बसलेल्या तरुणीने तिथेच सोबत आणलेले विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
 या घटनेनंतर आरोपी मयूर ने तरुणीला शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथे हलवण्यात आल्या. उपचारादरम्यानही पोलिसात तक्रार करू नये म्हणून मयूरकडून तरुणीला धमक्या दिल्या जात होत्या, तरुणीच्या कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकीही मयूरने दिली. उपचारादरम्यान प्रकृती सुधारल्यानंतर तरुणीने जळगाव जामोद पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी मयूर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करीत आहेत.