खळबळजनक! नायगाव खुर्द येथील "त्या"विवाहितेची आत्महत्या नव्हे खून! दिरानेच केला भावजीचा खून; कारण प्रेमप्रकरण! आधी दोरीने गळा आवळला मग मृतदेह पेनटाकळी धरणात फेकला...पोलिस चौकशीतून धक्कादायक खुलासा...!

 
हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नायगाव खुर्द येथील ३० वर्षीय विवाहितेने पेनटाकळी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी उजेडात आली होती. मात्र अमडापूर पोलिसांच्या तपासात ही आत्महत्या नसून खून असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात विवाहितेच्या दिरानेच गळा आवळून तिचा खून केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे...

या प्रकरणी मृतक आशा किशोर गायकवाड हिच्या भावाच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा आणि दिराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून सखोल चौकशी सुरू केली असता, आरोपी दिर मधुकर शामराव गायकवाड याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

  आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, मागील तीन वर्षांपासून मृतक आशा हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्याच दरम्यान तिने वारंवार लग्नाची मागणी केली. अखेर मोळा मोळी (ता. मेहकर) येथील एका मंदिरात त्याने तिला कुंकू लावून लग्नाचा बनावही केला. तसेच तिच्या जुन्या मंगळसूत्राऐवजी त्याने स्वतःच्या नावाने नवीन मंगळसूत्र बनवून तिच्या गळ्यात घातले होते. मात्र आशा हिच्या सततच्या पैशांच्या मागण्यांमुळे मधुकर वैतागला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याने तिचा खून करून हे प्रकरण संपवण्याचा निर्णय घेतला. 

असे घडवले हत्याकांड...

२९ जून रोजी आशा, तिचा पती आणि मधुकर सोयाबीनच्या पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी आशा घरी जाण्यास निघाली, तिच्या मागून मधुकरही निघाला.रस्त्यात त्याने तिला गाठले व त्यांच्या गट नंबर ३१ मधील शेताजवळ नेले. तेथे त्याने सोबत आणलेल्या दोरीने गळा आवळून तिला ठार मारले. ‘आता मी तुला मारून टाकतो’ असे गमतीने म्हणत त्याने गळा आवळला असता, आशानेही गमतीने होकार दिला. पण मधुकरने हे खरेच केले. खून केल्यानंतर त्याने प्रेत पेनटाकळी धरणात टाकले व ते गाळाखाली दाबले.

तसेच तिच्या टिफिनची थैली, चप्पल व खून करताना वापरलेली दोरीसुद्धा धरणात फेकून त्यावर दगड ठेवण्यात आले. तपासादरम्यान आरोपीने ही सर्व कबुली पोलिसांना दिली.
या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी भादंवि कलम १०३(१), २३८(अ) अंतर्गत गुन्ह्यात वाढ केली आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली सखोलपणे सुरू आहे.