खळबळजनक! विवाहितेची मुलासह आत्महत्या! इमारतीवरून मारली उडी! त्याआधी लाल रंगाच्या लिपस्टिकने लिहिली चिट्ठी.; धक्कादायक कारण समोर... नवरा घ्यायचा ...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पतीसह सासू व नणंदकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून एका ३१ वर्षीय विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह पुण्यातील इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १७ जून रोजी घडली. मृत महिलेने आत्महत्येपुर्वी लाल रंगाच्या लिपस्टीकने लिहिलेल्या चिठ्ठीत नणंदेकडून होणाऱ्या छळामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या प्रकरणी पतीस अटक करण्यात आली असून सासू आणि नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुरी शशीकांत देशमुख (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, तिच्यासोबत तिचा मुलगा विश्वजीत (वय ६) याचाही मृत्यू झाला आहे. मयुरीचा पती शशीकांत त्र्यंबकराव देशमुख (वय ३८) खामगावमधील घाटपुरी नाका येथील असून, पुण्यातील आंबेगाव येथील कल्पक सृष्टी दळवीनगर येथे पत्नी आणि मुलासह वास्तव्यास होता. तो खासगी वाहनचालक म्हणून काम करत होता. मात्र पत्नीवर संशय घेऊन तो वारंवार तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करत असे. याशिवाय, सासू रमाबाई देशमुख (वय ६५) व नणंद मेघा रविंद्र देशमुख (रा. येवदा, ता. दर्यापूर) या दोघी मायलेकी देखील मयुरीला सतत त्रास देत असल्याचे समोर आले आहे.
या सततच्या जाचाला कंटाळून मयुरीने पुण्यातील त्यांच्या वास्तव्याच्या इमारतीच्या गच्चीवरून आपल्या मुलासह उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना मिळालेल्या लाल लिपस्टीकने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने स्पष्टपणे नणंदेच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.
या प्रकरणी मयुरीचा भाऊ सचिन ठाकरे (वय २४, रा. खामगाव) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती शशीकांत, सासू रमाबाई आणि नणंद मेघा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती शशीकांतला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.