मेहकरकडे निघालेल्या सिहोरी ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात! कोथळीजवळ ट्रकला जोरदार धडक – २ ठार, २० जखमी...

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरकडे निघालेली सिहोरी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आज (४ जून) पहाटेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाजवळ भीषण अपघाताला सामोरी गेली. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत.

  सदर लक्झरी बस सुरतहून निघून मेहकरकडे जात होती. सकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कोथळी गावाजवळील उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या ट्रकला बसने जबर धडक दिली. धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की बसचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व स्थानिक नागरिकांनी मिळून बचाव कार्य हाती घेतले. सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.