मलकापूर ग्रामीण हद्दीत २४ तासांत दुसरा दरोडा; धानोऱ्यात किराणा दुकान फोडले, रोकड लंपास...

 
मलकापूर : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या २४ तासांत दुसऱ्या दरोड्याची घटना समोर आली आहे. धानोरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या सागर कोल्हे यांच्या किराणा दुकानाला अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लक्ष्य केले. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नेमकी किती रक्कम चोरीला गेली, याबाबतचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. 

घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर फिंगरप्रिंट एक्स्पर्ट आणि मोबाईल फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले. दरम्यान, यापूर्वी काटी येथे दरोड्याच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच धानोऱ्यात पुन्हा चोरीची घटना घडल्याने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.