शाळकरी मुलांना जीवे मारण्याची धमकी देत १६ हजारांची लूट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! मलकापुरात खळबळ

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शाळेची फी भरण्यासाठी दिलेले १६ हजार रुपये हिसकावून घेत दोन शाळकरी मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरातील अहमदपूर परिसरात घडली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदपूर येथील सय्यद जाबीर सय्यद सुलतान (वय ३२) यांनी आपल्या मुलांच्या शाळेच्या शुल्कासाठी १६ हजार रुपये दिले होते. हे पैसे घेऊन दोन्ही मुले शाळेत जात असताना अहमदपूर परिसरात दोन जणांनी त्यांना अडवले.

यावेळी एका आरोपीने मुलांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून घेतली. दुसऱ्या आरोपीने एका मुलाच्या खिशातील १६० रुपये काढून घेतल्याचाही आरोप आहे. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी परिसरातील नागरिकांकडे धाव घेतली. नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

या प्रकरणी सय्यद जाबीर सय्यद सुलतान यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी रोशन शेख उर्फ रिजवान बिल्डर (रा. वेठीची, मलकापूर) आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३५१(२) आणि ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भेडे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.