सुनगावमध्ये सफाई कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

 
सुनगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथे २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. गणेश मिरटकर असे मृत तरुणाचे नाव असून तो सूनगाव ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मिरटकर यांनी आपल्या राहत्या घराशेजारील बकरीच्या शेडमध्ये मोटरसायकलच्या लोखंडी वायरच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

दरम्यान, मृतकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीत सोन्याच्या वाटपाच्या वादातून संशयित रवि नारायण धुळे हा सतत धमक्या देत असल्याचा आरोप केला आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून गणेशने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८ व ३५१ (२) अन्वये संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे सुनगाव परिसरात शोककळा पसरली आहे.