रेती तस्करांचा हैदोस सुरूच; एलसीबीने केली धडक कारवाई; ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त...
Sep 15, 2025, 10:13 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्र तसेच धरण क्षेत्रातून होणारी अवैध रेती तस्करीला आळा बसावा यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतल्यामुळे स्थानिक महसूल प्रशासन सुद्धा कार्यवाही करताना दिसत आहे. परंतु त्याला सुद्धा न जुमानता रेती तस्कर आपला कार्यभाग उरकताना दिसत आहे. बुलढाणा येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील रेती तस्कराला टिप्पर सह पकडून गुन्हा दाखल केला आहे तसेच ३५ लाखाचा मुद्देमाल अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जप्त करून पोलीस स्टेशनला लावले आहे.
ही कारवाई १४ सप्टेंबर च्या मध्यरात्री दरम्यान करण्यात आली, तालुक्यात खडकपूर्णा नदी पात्रातील अवैध रेती वाहतूक तसेच उपसा करणाऱ्या तस्करांवर स्थानिक महसूल पथक कारवाई करत आहे परंतु ग्राम पातळीवर काम करणारे महसूल कर्मचारीच या तस्करांना सहकार्य करत असल्यामुळे यांचे मनोबल आणखी वाढले आहे. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री दरम्यान सिनगाव जहांगीर येथून अवैध रेती वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून देऊळगाव राजा चिखली रोडवरील शिनगांव फाटा येथे अवैध रेती वाहतूक करताना टाटा कंपनीचे टिप्पर एमएच 14 एम एच 80 88 पाठलाग करून पकडले. 35 लाख रुपये किमतीचे टिप्पर तसेच चार ब्रास रेती किंमत चाळीस हजार पंचा समक्ष जप्त करून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला लावण्यात आलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय सारंगधर बोबडे राहणार सिनगाव जहांगीर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे .
कारवाईची माहिती पोहचवली जाते रेती तस्करापर्यंत या घटनेतील आरोपी आणि स्थानिक ग्राम पातळीवर महसूल कर्मचारी यांचे संगमनत असून महसूल कर्मचारी एकीकडे शासनाचे पगार घेऊन कार्यवाहीला समर्थन न करता अवैध रेती मध्ये त्याची भागीदारी असल्याने येणाऱ्या महसूल पथकाची सदर कर्मचाऱ्याकडून इथं भूत माहिती संबंधिताला मिळते . सदर कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव सुद्धा स्थानिक महसूल कार्यालयाकडे पडून असून त्यावर ते कसले प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.