लिलाव झालेल्या घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत, महसुलाला लाखोंचा फटका!
Updated: Mar 11, 2026, 11:43 IST
मलकापूर पांग्रा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा परिसरात सध्या रेती माफियांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून रात्रंदिवस बेकायदेशीर रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विना क्रमांकाचे टिप्पर सुसाट वेगाने धावत असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे.
नदीपात्रातील लिलाव केलेला हर्रास घाट तक्रारीनंतर कागदोपत्री बंद असल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात मात्र या घाटातून छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. रात्रीच्या वेळी दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने तब्बल ४० फूट खोलीपर्यंत उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. हे उत्खनन पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असल्याचीही चिंता व्यक्त होत आहे.
दिवसा महसूल विभागाचे अधिकारी किंवा तलाठी तपासणीसाठी उपस्थित नसल्याचा फायदा घेत टिप्पर चालक एकाच पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारत अवैध रेती वाहतूक करत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या नियंत्रणाअभावी दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोपही होत आहे.
याशिवाय महाखनीज अॅपद्वारे कोणतेही मॉनिटरिंग होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवलेली नाही, तसेच घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्यामुळे अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हर्रास घाटातील अवैध रेती उत्खनन त्वरित बंद करावे आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अमोल साळवे यांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास अमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.