कोटेश्वर–जमनापुरी घाटात रेती माफीयांवर धडक कारवाई; आठ टिप्पर केले जप्त; एक कोटी 62 लाखांचा एवज जप्त; तहसील, पोलिसांची संयुक्त कारवाई...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर तालुक्यातील कोटेश्वर–जमनापुरी घाट, मौजा नरवेल येथे अवैध रेती उत्खनन करणार्रयांवर धडक कारवाई करण्यात आली. तहसील आणि पोलिसांनी संयुक्तपणे 24 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत रेतीने भरलेले तब्बल आठ टिप्पर पकडण्यात आले असून जप्त केलेल्या रेती व वाहनांची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी किरण पाटील तसेच उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे (मलकापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समाधान सोनवणे (मलकापूर) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरी यांच्यासोबत संयुक्तपणे राबवली.

कारवाईदरम्यान नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंत सिंग राजपूत (मलकापूर), व्ही. एन. कोल्हे (मंडळ अधिकारी, धरणगाव), धीरज जाधव (तलाठी, मलकापूर), राहुल खर्चे (तलाठी, दसरखेड), पंकज जाधव व सचिन चोपडे (महसूल सेवक) यांच्यासह पोलीस आरसीबी पथक सहभागी झाले होते.
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या राबवलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.