लोणारमध्ये बनावट कीटकनाशकांची विक्री; 29 हजारांचा मुद्देमाल जप्त; Syngenta कंपनीच्या नावाने बनावट Isabion विक्रीप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल...
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिहंत ऍग्रो कृषी सेवा केंद्र येथे Syngenta कंपनीचे Isabion औषध बनावट स्वरूपात पॅकेजिंग करून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ,शासकीय पंच व कृषी अधिकारी यांच्यासह नमूद दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दुकानातील रॅकमधून तसेच पाठीमागील स्टोअर रूममधून Isabion 1 लिटर Syngenta कंपनीच्या 16 सिलबंद बॉटल्स मिळून आल्या. प्रत्येकी किंमत ₹1,813 प्रमाणे एकूण ₹29,008 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या बॉटल्सची तपासणी करताना त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मूळ बॉटलच्या तुलनेत बनावट बॉटलवरील लोगोचा रंग फिक्कट हिरवा आढळून आला, तर मूळ बॉटलवर गडद हिरव्या रंगाचा लोगो आहे. तसेच इंग्रजीतील GTIN, GTIN नंबरमधील “2” ऐवजी “02”, सिरीयल नंबरमधील फॉन्टमधील फरक, तसेच बॉटलच्या झाकणाच्या रंगातही तफावत आढळून आली. या बनावट औषधांची विक्री करून आरोपीने Syngenta कंपनीची प्रतिमा मलीन केली, शासनाच्या महसुलाचे नुकसान केले तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीविषयक मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण केली, असा आरोप फिर्यादीने तोंडी रिपोर्टमध्ये केला आहे.या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या कारवाईमुळे लोणार परिसरात बनावट कृषी औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी औषधे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
