साहिलवर साखरखेर्डात तर ऋतूजावर शिंदीत अंत्यसंस्कार; दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त; प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली हाेती आत्महत्या...
२३ सप्टेंबर रोजी दुपारी सोनू मोटारसायकलने खामगावला गेला. पूर्वनियोजितप्रमाणे तो ऋतूजाला भेटला व दोघे हॉटेल जुग्नू येथे गेले. तेथे खोलीत बराच वेळ वाद झाला. त्यातून रागाच्या भरात सोनूने ऋतूजावर चाकूने वार करून तिचा खून केला व त्यानंतर स्वतःच्या छातीत चाकू खुपसून आत्महत्या केली.
घटनेची वार्ता साखरखेर्डा व शिंदीत पसरताच मोठी खळबळ उडाली. दोन्ही कुटुंबीय खामगाव येथे दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. साखरखेर्डा येथील भोगावती नदीकाठच्या स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता सोनूचे तर शिंदी येथील स्मशानभूमीत संध्याकाळी ६ वाजता ऋतूजाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनूने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलिस तपास सुरू आहे. खामगाव पोलिसांना साखरखेर्डा पोलिसांचीही मदत मिळत आहे. सध्या खामगाव व मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या देखरेखीखाली तपास सुरू असून, खून व आत्महत्येचे खरे कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. साखरखेर्डा व शिंदी परिसरात शांतता असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.