'साहेब रस्त्यावर, माफिया पसाऱ्यात!' लोणार तहसीलदारांची 'कारवाई विना' वरात; रिकाम्या हाताने परतलेले प्रशासन की आधीच फुटलेली माहिती?
साहेब आले... पण 'ताडपत्री'वाले गायब झाले कुठे?
रोज शेकडो डंपर आणि टिपर ताडपत्री झाकून, सुसाट वेगाने महसूल बुडवत लोणारच्या रस्त्यांवरून धावत असतात. मात्र, काल जेव्हा तहसीलदार साहेब पूर्ण फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले, तेव्हा संपूर्ण रस्ता चकाचक आणि शांत होता. एकही अवैध वाहन महसूल विभागाच्या हाती लागले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे की, रोज डोळ्यांना दिसणारे मृत्यूचे डंपर साहेब रस्त्यावर येताच अचानक जमिनीतून गिळले की आभाळात पळाले?कारवाईची माहिती आधीच 'लीक' झाली होती का?तब्बल दोन तीन आठवडे नंतर तहसीलदारांना रस्त्याची आठवण झाली, पण त्यांच्या या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे. साहेब कार्यालयातून निघण्यापूर्वीच माफियांपर्यंत "कारवाईचा सांगावा" पोहोचला होता का? असा संशय आता बळावला आहे. "आम्ही रस्त्यावर उतरलो होतो पण गाड्या मिळाल्या नाहीत," असे कागदोपत्री दाखवून स्वतःची कातडी वाचवण्यासाठीच तर हा बनाव रचला गेला नव्हता ना, असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.
'नवे साहेब' सिंघम, मग जुन्यांच्या हाताला 'भोपळा' का?
नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) पदभार स्वीकारताच धडक कारवाया करून अवैध वाहने जप्त केली. मात्र, त्यांच्या पाठोपाठ रस्त्यावर उतरलेल्या तहसीलदारांच्या हाती एकही गाडी लागू नये, हा शुद्ध दैवयोग आहे की 'अर्थपूर्ण' नियोजन? भानापूर गावाजवळील अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये आधीच तीव्र संताप आहे, त्यातच महसूल विभागाच्या या "रिकाम्या हाताने परतलेल्या" मोहिमेमुळे प्रशासनाची नाचक्की झाली आहे.
जनतेचा थेट आणि जळजळीत सवाल:साहेब रस्त्यावर उतरणार म्हणून माफियांची वाहने आधीच कुणाच्या सांगण्यावरून लपवून ठेवली होती?एका बाजूला SDO गाड्या पकडतात, मग तहसीलदारांना एकही गाडी का सापडत नाही?हा केवळ अपघाताच्या गुन्ह्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी केलेला 'स्टंट' होता का? भानापूरजवळच्या अपघाताने एका निष्पापाचा जीव घेतला, पण लोणारच्या महसूल विभागाला त्याचे कसलेही गांभीर्य नसल्याचे या निष्फळ कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. रस्त्यावर उतरून एकही गाडी न पकडता केवळ हवेत हात हलवून परतणाऱ्या या कारभाराची आता उच्चस्तरीय चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.