दुःखद! आदिवासी कुटुंबातील ९ जणांना अन्नातून विषबाधा; बुरशी आलेले अन्न खाल्ले?चिमुकल्या बहीण - भावाचा मृत्यू! जळगाव जामोद तालुक्यातील घटना...

 

 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव येथे अतिशय दुःखद प्रकार समोर आला आहे. वीट भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील नऊ जणांना अन्नातून विषबाधा झाली, त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले दोघे चिमुकले सख्खे बहीण - भाऊ आहेत. उर्वरित ६ जणांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

  जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव गावाशेजारी असलेल्या शिवचरण घ्यार यांच्या शेतात वीटभट्टी फॅक्टरीत वेगवेगळ्या भागातील नातेवाईक असलेले ३ ते ४ आदिवासी कुटुंब काम करतात. ते शेतातच वास्तव्याला आहे. २२ सप्टेंबरच्या रात्री ९ जणांना विषबाधा झाली. या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला पाटील सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचेसमवेत जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद जाधव, डॉ. काळे, डॉ. थिगळे, डॉ. रुपाली घोलप यांनी प्राथमिक उपचार करीत विषबाधा झालेल्यांना आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेने खामगाव येथे नेले. रोशनी सुनील पावरा (२)व अर्जुन सुनील पावरा (६) या बहिण- भावांचा खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
तर इतर ६ जणांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. बहिण भावांचे शववाविच्छेदन करून आई- वडिलांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. त्यानंतर त्यांचेवर आसलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असलेल्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळावर आरोग्य विभागाची टिम गेली असता खाद्य पदार्थावर बुरशी आलेले अन्न सेवन केल्याने विषबाधा झाल्याचे समजते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर विषबाधा झाल्याचे खरे कारण समोर येईल..