

EXCLUSIVE देऊळगावराजा पोलिस खून प्रकरणात बडतर्फ पोलिसाचाही सहभाग; चारही आरोपींना ५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी...
Mar 31, 2025, 21:07 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजा पोलिस मर्डर प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी पोलिस दलाशी संबंधित आहे. दिलीप बाजीराव वाघ(५२, बंजार उमरद, जालना ) असे त्याचे नाव असून तो छत्रपती संभाजी नगर जिल्हा पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत होता, मात्र एक गुन्ह्यातील सहभागामुळे सध्या त्याला बडतर्फ करण्यात आलेले आहे.
३० मार्चला देऊळगाव राजा सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूलसमोरील वनविभागाच्या जागेत एका स्विफ्ट डिझायर गाडीत जालना पोलिस दलातील कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. दरम्यान पोलिसांनी वेगवान तपास करीत आधी १ आणि नंतर ३ असे एकूण ४ आरोपी अटक केले होते. गिरोली खुर्दच्या बाबासाहेब म्हस्के यांनी अनैतिक संबंधातून जवळचा मित्र असलेल्या ज्ञानेश्वर म्हस्के याच्या खुनाची सुपारी जालना येथील गुंड टायगर कमलाकर वाघ ऊर्फ टायगर याला दिली होती. टायगर ने दिलीप वाघ आणि बबन शिंदे या दोघांना या कामासाठी बाबासाहेब म्हस्के याच्या ताब्यात दिले. तिघांनी मिळून ज्ञानेश्वर मस्के यांचा गळा आवळून खून केला होता.दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांनी अधिक तपासासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी मा.न्यायालयाकडे केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना ५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे...