दुचाकीच्या डिक्कीतून ४.५० लाख रुपये केले लंपास; नाश्ता करणे युवकाला पडले महागात...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ४ लाख ५० हजार रुपयांची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी बुलढाणा रोडवरील एका नाश्त्याच्या हॉटेलसमोर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा येथील दिपक सुभाष किनगे यांनी आपल्या मित्राला घर बांधण्यासाठी काही रक्कम दिली होती. मित्राने परत केलेली ही रक्कम ते घेऊन दुचाकीने दाताळ्याकडे जात होते. दरम्यान, बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळील राजू इंगळे यांच्या नाश्त्याच्या हॉटेलवर ते मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी थांबले. त्यावेळी पैसे असलेली पिशवी त्यांनी दुचाकीच्या डिक्कीतच ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने डिक्की उघडून ४.५० लाख रुपयांची पिशवी पळवली. चोरीची घटना उघडकीस येताच दिपक किनगे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. शहर पो.स्टे. येथे अज्ञात आरोपीविरुद्ध  कलम ३०२, २ बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय दिपक वारे करीत आहेत.