दरोडेखोरांचा कहर: मलगीत दोन घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
चिखली तालुक्यातील मलगी गावात आज पहाटे सुमारास चोरट्यांनी थैमान घालत दोन घरे फोडली. या दरोड्यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, पहिला दरोडा प्रभाकर भीमराव भुसारी यांच्या घरी टाकण्यात आला. चोरट्यांनी त्यांच्या घरातून अंदाजे ३५ ते ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. यानंतर त्यांनी प्रल्हाद कोंडू पवार यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरले.
प्रल्हाद पवार यांच्या घराशेजारी असलेल्या शेतातील एका पेटीचीही तोडफोड करण्यात आली, मात्र त्या पेटीत चोरट्यांना विशेष काही सापडले नाही.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू आहे. या दरोड्यात नेमका किती ऐवज चोरीस गेला याचा तपशील अजूनही स्पष्ट झालेला नाही.