गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला!; २४ हजारांची लाच मागणारा संरक्षण अधिकारी रंगेहाथ जाळ्यात, भ्रष्टाचाराने पुन्हा उघड केला विदारक चेहरा...जळगाव जामोद "एसीबी"ची कारवाई...
तक्रारदाराच्या मामाची मुलगी निराधार व दिव्यांग असून, तिला शासनाच्या कांतिज्योती बालसंगोपन योजना तसेच इतर विशेष योजनांमधून टप्प्याटप्प्याने ४८ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. भविष्यातही शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. तडजोडीनंतर १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले.
नियोजनाप्रमाणे जळगाव जामोद येथे तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात महिला व बालविकास विभागातील बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचारी जगन्नाथ तुकाराम पिंपळे यांचीही भूमिका समोर आली असून, त्यांच्याविरुद्धही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गरीब, निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असलेल्या योजनांवरच लाचेचा विळखा पडत असल्याचे हे प्रकरण अत्यंत संतापजनक मानले जात आहे. जनतेच्या करातून उभ्या राहिलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेमलेले अधिकारीच जर हक्काच्या मदतीसाठी लाच मागत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, पोलिस उपनिक्षक शाम भांगे ,यांच्यासह एसीबीच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे. भ्रष्टाचार हा केवळ कायद्याचा गुन्हा नसून तो सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांवर टाकलेला दरोडा असल्याची भावना या कारवाईनंतर पुन्हा एकदा व्यक्त होत आहे.