काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ७.६५ लाखांचा तांदूळ पकडला; खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या हद्दीत एलसीबीची धडक करवाई, एकास अटक...
जिल्ह्यातील सामान्य, गरीब व गरजू नागरिकांसाठी शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वितरित केले जाते. मात्र याच धान्याची चोरटी वाहतूक करून काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा घटनांवर आळा घालण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने २४ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, भावनगर (गुजरात) येथील मनोज भाई बनुभाई (५३) हा चालक ट्रक क्र. जीजे-२३-७७४१ मध्ये शासनाचा तांदूळ घेऊन बाळापूरहून नांदूरकडे जात आहे. त्यानुसार पथकाने पारखेड फाट्याजवळ सापळा रचून ट्रकसह आरोपीला ताब्यात घेतले.यावेळी पाेलिसांनी सुमारे २५५ क्विंटल तांदुळ किंमत ७ लाख ६५ हजार, ट्रक किंमत अंदाजे १९ लाख रुपये असा एकूण २६ लाख ६५ हजार रुपयांचा एवज जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोहेकॉ. एजाज खान, पोको. अमोल शेजोळ, विक्रांत इंगळे व चापोकाॅ शिवानंद हेलगे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.