सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीसह रोकड लंपास...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील नंदनवन नगर परिसरात एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत ४ लाख २४ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष प्रल्हाद पहुरकर (वय ६० वर्षे) रा.अग्रवाल टेन्ट हाऊसजवळ, नंदनवन नगर, मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ११ जुलै रोजी दुपारी १२ ते रात्री ८ वाजेदरम्यान आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेलो होतो. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. रात्री जेव्हा पहुरकर कुटुंबीय घरी परतले, तेव्हा मुख्य दरवाजावरील कडीकोंडा जागेवर होता, मात्र कुलूप गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटाचे कुलूप तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास झाल्याचे समोर आले.

चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याच्या दोन बांगड्या वजन अंदाजे ४ तोळे किंमत १ लाख २० हजार रुपये, सोन्याची सौभाग्यवती पोत वजन अंदाजे ४ तोळे, किंमत १ लाख २० हजार रुपये, सोन्याची चैनसारखी पोत वजन अंदाजे ३ तोळे, किंमत ९० हजार रुपये, लहान सोन्याची पोत वजन अंदाजे १ तोळा किंमत ३० हजार रुपये, सोन्याची गोल रिंगची अंगठी वजन अंदाजे ४ ग्रॅम किंमत १२ हजार रुपये, चांदीच्या दोन जोड चैनपट्ट्या वजन अंदाजे ६ तोळे किंमत १२ हजार रुपये, नगदी रोकड ४० हजार रुपये, असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.