बुलढाणा शहरात अवैध देशी दारू अड्ड्यावर छापा; २०० लिटर गावठी दारू, अन् बरंच काही सापडलं! दोन महिलांविरुद्ध गुन्हा, ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!
Jun 11, 2025, 15:35 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा शहर पोलीस ठाणे हद्दीतील जुनेगाव परिसरात अवैधरित्या देशी हातभट्टी दारू तयार करून साठवणूक करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून केलेल्या या कारवाईत एकूण ८६,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध दारू उत्पादन व विक्रीस आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी पोनि. अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून ही कारवाई राबवण्यात आली.
आज, ११ जून २०२५ रोजी सकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, जुनेगाव परिसरातील काही महिला आपल्या राहत्या घरी गावठी दारू तयार करून विक्रीसाठी साठवून ठेवत आहेत. त्यानुसार पथकाने छापा टाकून दोन महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये एकीचे वय ४४ वर्षे तर दुसरीचे वय ३८ वर्षे असून, दोघीही बुलढाण्याच्या रहिवासी आहेत.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे २००लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत अंदाजे २० हजार रुपये) तसेच मोह सडवा, लोखंडी ड्रम, स्टील हंडे, प्लास्टिक कॅन व इतर साहित्य (किंमत अंदाजे ६६,८०० रुपये) असा एकूण ८६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित महिलांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कलम ६५ (क)(फ)(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये सपोनि यशोदा कणसे, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, अनुप मेहेर, गणेश पाटील, विजय पैठणे, वनिता शिंगणे, विजय वारुळे, अरविंद बडगे, संजय भुजबळ, गणेश वाघ, वैभव मगर, भारत जाधव, दीपाली चव्हाण, पूजा जाधव, कोमल इंगळे यांचा समावेश होता...