देवदर्शनाच्या वाटेवर काळाचा घाला; आतेभाऊ व मामेबहीण जागीच ठार; अंत्री खेडेकर व पांग्री उबरहंडे गावांवर शोककळा

 
 मेरा बु. (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : श्रद्धेने भरलेली देवदर्शनाची वाट अचानक मृत्यूच्या सावलीत बदलली… नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या दोन तरुण जीवांवर काळाने घाला घातला. देवदर्शनासाठी जात असताना दुचाकीवरून प्रवास करणारे आतेभाऊ आणि मामेबहीण हायवा वाहनाच्या भीषण अपघातात जागीच ठार झाले. ही हृदयद्रावक घटना ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे अंत्री खेडेकर आणि पांग्री उबरहंडे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी समाधान खेडेकर हे कुटुंबासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. ते पत्नी आणि मुलगी भूमी समाधान खेडेकर (वय २१) हिच्यासह देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला जाण्याच्या उद्देशाने सुरतहून नाशिक येथे बहिणीकडे आले होते. देवदर्शनासाठी निघताना बहिणीचा मुलगा शिवम राजेश उंबरहांडे (वय २२, रा. पांग्री उबरहांडे, ता. चिखली) हा देखील सोबत होता.
भूमी आणि तिचा आतेभाऊ शिवम हे दोघे दुचाकीवरून तर आई-वडील व अन्य नातेवाईक एसटी बसने देवदर्शनासाठी निघाले होते. नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात असताना गोदावरी नदीवरील पुलावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या डब्बरने भरलेल्या हायवा वाहनाने (क्र. एमएच १५ जेआर ४४०४) अचानक नियंत्रण गमावले. काही क्षणांतच ते वाहन थेट दुचाकीवर पलटी झाले आणि क्षणार्धात दोन्ही तरुणांचे आयुष्य संपले.
डोळ्यांसमोर मृत्यूचे थरारक दृश्य
अपघाताचे भयावह दृश्य पाहून जव्हार चौफुली पोलिस चौकीतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने हायवाखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
वाढदिवसाचा आनंद… आणि देवदर्शनाचा संकल्प अपूर्ण
या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे. विशेष म्हणजे शिवमचा अवघ्या एक दिवस आधी, २ जानेवारी रोजी वाढदिवस झाला होता. तो बीएससीचे शिक्षण घेत होता, तर भूमीने बीएचे शिक्षण पूर्ण केले असून पुढील शिक्षण सुरू होते. वाढदिवसाचा आनंद आणि देवदर्शनाची ओढ अशा आनंदमय क्षणीच काळाने झडप घातली आणि दोन्ही तरुणांचे स्वप्न अधुरेच राहिले.
एकाच क्षणात हसतीखेळती घरं उजाड झाली. देवाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दोन निष्पाप जीवांच्या अकाली मृत्यूने अंत्री खेडेकर व पांग्री उबरहंडे गावांमध्ये शोकसागर उसळला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.