वाकोडी शिवारात 'देहव्यापाराचा' पर्दाफाश; लेडी सिंघम यशोदा कणसेंच्या धडाकेबाज कारवाईत २ महिलांची सुटका, तिघे जेरबंद..!

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या 'अवैध धंदे मुक्त जिल्हा' मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या 'लेडी सिंघम' सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांच्या पथकाने २५ मे रोजी मलकापूरच्या वाकोडी शिवारातील महावीर नगरात सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर छापा टाकून खळबळ उडवून दिली.
निवासी घरात सुरू होता 'नरकाचा बाजार'

पोलिसांना खात्रीशीर खबर मिळाली, त्यावरून पोलिसांनी  महावीर नगरमधील एका खाजगी घरात काही महिलांना पैशाचे आमिष दाखवून व जबरदस्तीने देहव्यापारासाठी प्रवृत्त केले जात आहे. आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांनी तातडीने रणनीती आखली. पथकाने अचानक छापा टाकताच परिसरात एकच गोंधळ उडाला. घरात प्रवेश करताच पोलिसांना आक्षेपार्ह स्थितीत एक ग्राहक आणि दोन पीडित महिला आढळल्या. महिलांना 'दलदलीत' ढकलणारे मुख्य सूत्रधार आणि व्यवस्थापक अशा दोन पुरुष व एका महिला आरोपीला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. या कारवाईत देहव्यापारातून कमावलेली रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

'लेडी सिंघम'चा दरारा कायम  

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेल्या यशोदा कणसे आपल्या धाडसी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. एक महिला अधिकारी असताना सुद्धा अत्यंत गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्या आघाडीवर राहिल्या आहेत. रात्रीच्या वेळीला महिला कर्मचाऱ्यांचा पथकाला सोबत घेऊन केलेली नियोजन बद्ध कारवाई कौतुकास्पद आहे..
यांनी केली कार्यवाही

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्य मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ.राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, सतीश हाताळकर, विजय वारुळे, पोकॉ.समाधान टेकाळे, अमोल वनारे, मंगेश सनगाळे, वैभव निंबाळकर, मपोअं. कोमल इंगळे, दिपाली चव्हाण यांनी ही कारवाई केली. परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कदम हे देखील सहभागी होते.