समृद्धीवर पुन्हा तांडव! धावती ट्रॅव्हल्स पेटली, कोळसा झाला! "त्या" काळया दिवसाची आठवण.. वातानुकूलित ट्रॅव्हल्सची सुरक्षा चव्हाट्यावर!
हा अपघात झाला समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्याच्या हद्दीत शिवनी पिसा गावाजवळ.. ट्रॅव्हल्स नागपूर वरून मुंबईकडे जात होती.. बसमधून धूर निघत असल्याचे अचानक चालकाच्या लक्षात आले बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या कडेला उभी केली. आरडाओरड करत त्याने सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. काही मिनिटांतच बसने पूर्ण पेट घेतला आणि डोळ्यादेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. संपूर्ण बस जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने एकाही प्रवाशाचा जीव गेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, गोंधळात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलिस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली आणि पर्यायी मार्गाने वाहने वळवली.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची अपुरी तांत्रिक तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणेची मर्यादित उपलब्धता यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवासी आणि नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, समृद्धी महामार्गावरील प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शासनाने व संबंधित विभागांनी तातडीने कठोर आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता होत आहे.
