३५ हजारांच्या बदल्यात साडेतीन लाखांचे आमिष! लुटीचा कट पोलिसांनी उधळला दोन सराईत आरोपी जेरबंद; ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

 
 मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): हैदराबाद येथील दोन व्यक्तींना साडेतीन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून मलकापूर येथे बोलावून त्यांची लुटमार करण्याचा कट मलकापूर शहर पोलिसांनी वेळेत उधळून लावला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन सराईत आरोपींना रंगेहात अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील दोन व्यक्तींना केवळ ३५ हजार रुपयांच्या बदल्यात तब्बल ३ लाख ५० हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले होते. या बहाण्याने त्यांना मलकापूर येथे बोलावून लुटण्याचा कट काही आरोपींनी रचला होता. याबाबतची खात्रीशीर माहिती मलकापूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

त्यानुसार पोलिसांनी गोपाळकृष्णनगर परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ईश्वर अशोक मेसरे (वय ३४, रा. नरवेल, ता. मलकापूर, सध्या यशोधाम कॉलनी, मलकापूर) आणि गौतम मुकुंदा तायडे (वय २२, रा. रमाईनगर, मलकापूर) यांचा समावेश आहे.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी लुटीची घटना घडण्यापूर्वीच उधळून लावण्यात यश आले. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींच्या इतर साथीदारांचा शोधही घेतला जात आहे.