मुख्याध्यापक आत्महत्या प्रकरण! संस्थेच्या अध्यक्षांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल! जानेफळच्या श्री शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापक कार्यालयातच घेतला होता मुख्याध्यापकांनी गळफास...
Apr 5, 2025, 09:17 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जानेफळच्या श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रत्नाकर उर्फ विजय शिवाजी गवारे (५६, रा. हिवरा खुर्द) यांनी २६ मार्च २०२४ रोजी आत्महत्या केली होती. संस्थाध्यक्षांनी त्रास दिल्यामुळेच मुख्याध्यापक गवारे यांनी शाळेच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती, या संदर्भातील वृत्त "बुलडाणा लाइव्ह"ने तेव्हा प्रकाशित केले होते. शिवाय रत्नाकर गवारे यांच्या वृद्ध वडिलांची बाजू देखील मांडली होती. अखेर या प्रकरणी वर्षभरानंतर मुख्याध्यापक रत्नाकर गवारे यांच्या वडिलांना न्याय मिळाला असून श्री शिवाजी शिक्षण संस्था हिवरा खुर्दच्या अध्यक्षांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी तुकाराम गवारे (७९) यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. मात्र, हे प्रकरण पोलिसांनी तेव्हा गांभीर्याने घेतले नव्हते. शिवाजी गवारे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, रत्नाकर गवारे हे जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकपदी कार्यरत होते. मूळचे हिवरा खुर्द येथील रहिवासी असलेले गवारे मेहकर येथे वास्तव्यास होते. संस्थेचा अध्यक्ष सागर श्रीकृष्ण देवकर, त्याचा भाऊ ज्ञानेश्वर श्रीकृष्ण देवकर, सहायक शिक्षक गजानन शंकर काळे, दुसरा सहायक शिक्षक तुळशीदास रामदास शेळके दोघे रा. जानेफळ आणि कनिष्ठ लिपिक अनिल गणपत चांदणे (मुंदेफळ, ता. मेहकर) यांनी रत्नाकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. शाळेच्या कामकाजावरून वाद घालायचे. शाळेची खोटे कामे करण्यास त्यांना भाग पाडले. तसेच खोट्या नोटीस बजावायला सांगितल्या. 'मुख्याध्यापकपदी राहण्याची तुझी लायकी नाही, तू राजीनामा दे' अशा धमक्या देत रत्नाकर गवारे यांना हिणवल्या जात होते. सर्वांनी मिळून मानसिक त्रास दिल्याने वैतागलेल्या रत्नाकर गवारे यांनी शाळेच्या आवारातच आत्महत्या केली होती..
वृद्ध वडिलांची ससेहोलपट
मुख्याध्यापक रत्नाकर गवारे यांचे आत्महत्याप्रकरण जानेफळ पोलिसांनी गांभीर्यपूर्वक न हाताळल्याने त्यांचे वृद्ध वडील शिवाजी गवारे यांना न्यायासाठी वरिष्ठस्तरापर्यंत चकरा माराव्या लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या. महिनाभरापूर्वी विशेष पोलीस महासंचालकांकडेही न्याय्य मागणी करण्यात आली. ७९ वर्षांच्या वडिलांना मुलास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मोठ्या खस्ता खाव्या लागल्या. अखेर उशिरा का होईना गुन्हा दाखल करण्यात आला.