शेतकऱ्यांना खंडणी मागणाऱ्या प्रशांत डिक्करला दोन दिवसांची पोलीस कोठडी... डिक्करांचा कोठडीत मुक्काम वाढला !

शेतकऱ्यांकडून उकळलेले पाच लाख करायचे आहेत पोलिसांना जप्त; शासकीय मोबदला मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागितली होती खंडणी...
 
शेगाव(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शेतकऱ्यांनी खंडणी उकळण्यासंदर्भात शुक्रवारी तक्रार नोंदविल्यानंतर स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेगाव पोलिसात खंडणी चा गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्यात आली होती. शनिवारी त्यांना शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे डिक्क्करांचा पोलीस कोठडीत मुक्काम आणखी वाढला आहे.
Buldhana
 बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी बाधित गाव नवीन ठिकाणी वसविण्यासाठी गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती घेतलेली आहे. त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. मात्र हा मोबदला प्रति हेक्टर ४० लाख रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीन पैशासाठी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत शुक्रवारी शेगाव येथील जिगाव प्रकल्पा अंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डीक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला होता. यावेळी डिक्कर समर्थक पळून गेले होते.दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसात तक्रार नोंदविली यावरून प्रशांत डिक्कर विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी रात्रभर पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर शेगाव पोलिसांनी आज शनिवारी डिक्कर यांना दुपारी शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने डिक्कर यांना २४ मार्च पर्यंत तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जीवानिशी ठार मारून गायब करण्याचीही धमकी... 
संग्रामपूर तालुक्यातून आलेले हिंगणा कवठळ या गावच्या सरपंचा पुष्पा मोरखडे, शेतकरी संदिप मोरखडे, हिरालाल मोरखडे, प्रफुल श्रीधर मोरखडे, मोहन श्रीपद उमाळे, प्रशांत अजाबराव बावस्कार व इतर शेतकऱ्यांनी शुक्रवारी शेगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळ प्रशांत डिक्कर यांनी भेट घेतली. तेंव्हा तेथे डिक्कर हा शेतकऱ्याला म्हणाला कि, मी तुम्हाला शासनाकडुन प्रती एकरी 40,00,000/- रु. मिळवुन देण्यासाठी माझे कार्यकर्ते घेऊन शेगांव येथील जिगांव प्रकल्प कार्यालयात आंदोलन करण्यासाठी जात आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रतीएकरी मला 5,00,000/- रु. द्यावे लागतील. सदर लाभासाठी प्रती एकरी 5,00,000/- रु. रक्कम जास्त असल्याने आम्ही त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला असता त्याने आम्हाला धमकावले कि, तुम्ही जर मला प्रती एकरी 5,00,000/- रु. दिले नाही, तर् मी तुमच्या विरोधात आंदोलन करुन तुम्हाला शासनाकडुन पैसे भेटु देणार नाही.पैसे मिळवून देणे माझ्या हातात आहे.आम्हाला प्रशांत डिक्करवर विश्वास नसल्याने आम्ही त्याचे पाठीमागे शेगावला आलो व शेगाव उड्डाण पुलाचे अलीकडे त्याला भेटुन आम्ही त्याला दिलेले 5,00,000/- रु. परत मागीतले तेंव्हा तो आम्हाला म्हणाला की, मी तुमचे पैसे परत देऊ शकत नाही, मी तुमचे काम करुन देतो, परंतु मला अडचणीत आणुन याबद्दल कोणाला सांगीतले तर् माझ्या कार्यकर्त्यांकडुन तुम्हाला जिवानीशी ठार मारुन गायब करुन टाकीन, अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नोंदविले आहे.
 
संतप्त शेतकरी डिक्करला मारणार तेवढ्यात पोलीस पोहोचले अन अनर्थ टळला !
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर हे जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तिथे शेतकरीही त्यांच्या मागावर पोहोचले. या ठिकाणी डिक्कर यांनी ज्या शेतकऱ्यांनी मला पैसे दिले नाही त्यांना मोबदला देऊ नका अशी भूमिका घेतली त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बोलचालीतून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर विषय हातापायी पर्यंत पोहोचला. मात्र याची कुण कुण आधीच शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांना लागल्यामुळे ते आपल्या पथकासह जिगाव प्रकल्प कार्यालयात पोहोचले. यावेळी शेतकरी आक्रमक होऊन डिक्कर यांच्यावर संताप व्यक्त करण्याच्या तयारीत असतानाच व झटापट चालू झाल्याबरोबर ठाणेदार पाटील यांनी परिस्थिती हाताळून प्रशांत डीक्कर यांना ताब्यात घेऊन कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या तावडीतून सोडविले. या ठिकाणी पोलीस जर दहा मिनिटे उशिरा पोहोचले असते तर कार्यालयातच अनर्थ घडला असता अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजब पत्र...!इतके दिवस झोपले होते काय..??
प्रशांत डिक्कर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होताच अचानकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाग आली आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी २२ मार्च रोजी एक पत्र प्रसिद्ध दिले असून या पत्रामध्ये प्रशांत डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष म्हणून काम करत होते परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जामोद मतदारसंघातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून स्वराज्य पक्षावर निवडणूक लढवली तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचा कुठलाही संबंध संघटनेशी नाही असे नमूद केले आहे. उल्लेखनीय म्हणजे विधानसभा निवडणुकीला बराच काळ झालेला असतांना सुद्धा आजपर्यंत संघटने कडून डिक्कर संदर्भात कुठलेही प्रसिद्धी पत्रक अथवा पक्षातून हकालपट्टी, पक्षाशी संबंध नाही असे पत्र जारी करण्यात आले नव्हते, मात्र आज खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांच्याशी आमचा संबंध नाही असे दाखविण्यात आले आहे. राजू शेट्टीच्या दुट्टपी व संशया स्पद भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.कारण डिक्कर युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष असताना त्यांच्याबद्दल जिल्ह्याध्यक्ष कसं काय पत्र काढू शकतात..? राजू शेट्टीनी भूमिका का जाहीर केली नाही..?? याविषयी शेतकऱ्यामध्ये उलट सुलट चर्चा आहे.
फेसबुक वर आजही ते स्वाभिमानीचेच !
प्रशांत डिक्कर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संबंध नाही असा खुलासा आज संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी केला. संघटनेचे नाव कुणी त्यांच्याशी जोडले तर त्याचे विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी पत्रात दिला. मात्र मागील तीन महिन्यांपासून प्रशांत डि lक्कर यांचे फेसबुक अकाउंट वर आजही ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आहेत. मग स्वाभिमानीला हे अजूनही दिसले नाही का ?असा प्रश्नही उपस्थित होत आहे.