मेहकर तालुक्यातील बेलगावच्या प्रसन्नची अकोल्यात आत्महत्या! अकोल्यात खोली करून राहत होता, NEET ची तयारी करत होता...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बारावी नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका विद्यार्थ्याने अकोला येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. प्रसन्न गोपीनाथ वानखडे असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मृत प्रसन्न वानखडे हा अकोल्यातील आकाशवाणी परिसरातील जलाराम सोसायटीत भाड्याने खोली करून राहात होता. २८ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ७ वाजता त्याने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. वर्गमित्रासह त्याचा नातेवाइक असलेला एक पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचापायी नैराश्य आल्याने प्रसन्नने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, अकोला येथे प्रसन्न व त्याच्या काही मित्रांचे भांडण झाले होते. पोलीस अधिकारी व एक पोलीस कर्मचारी त्याला त्रास देत होता. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी १ मार्च रोजी घेतला. दरम्यान, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सातव यांनी प्रसन्नच्या नातेवाइकांची समजूत काढली. तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या, नंतर कधीही तक्रार द्या, मग कुणीही दोषी असलातरी आम्ही गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, शोकाकुल वातावरणात मूळगावी बेलगाव येथे प्रसन्नच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.