“कॅफेच्या आड अश्लील प्रकार उघड; खामगावमध्ये ‘फूड स्टोरी’वर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव–शेगाव रोडवरील “फूड स्टोरी” या कॅफेवर खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कॅफेच्या नावाखाली संशयास्पद व गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून पोलिसांना मिळत होत्या. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
 कॅफेमध्ये स्वतंत्र कॅबिन्समध्ये तीन प्रेमी युगुल आढळून आले. या ठिकाणी ग्राहकांना तासाभरासाठी स्वतंत्र, बंदिस्त कॅबिन उपलब्ध करून दिले जात होते. यासाठी सुमारे २०० रुपये प्रति तास आकारले जात असल्याची माहितीही पुढे आली आहे. विशेष म्हणजे, येथे शालेय व अल्पवयीन तरुण-तरुणींनाही प्रवेश दिला जात होता.

अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही कारवाई होत नसल्याने नाराजी वाढत होती. अखेर ठाणेदार पवार यांनी स्वतः लक्ष घालून छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईनंतर कॅफे चालकाविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या धाडसी कारवाईबद्दल पालक वर्ग आणि स्थानिक नागरिकांकडून ठाणेदार रामकृष्ण पवार यांचे कौतुक होत आहे.