नोकरी लावून देतो म्हणत बिचाऱ्या बेरोजगार तरुणाकडून उकळले ५ लाख; ३ वर्षे झाले तरी नोकरीचा पत्ता नाही! नांदुरा पोलिसांनी भामट्याला कर्नाटकातून आणले उचलून...

 
 नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुर्टी येथील अक्षय देवीदास सातव या बेरोजगार तरुणाची नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख २० हजार रुपयाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला नांदुरा पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने कर्नाटकातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.

शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी (वय २८ रा. खारमनी जि. बेळगांव) असे या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने या आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदुरा तालुक्यातील खुमगांव बुर्डी येथील अक्षय देवीदास सातव या २६ वर्षीय बेरोजगार तरुणाला कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील खारमनी येथील आरोपी शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी याने चांगली नोकरी लावून मोठे सॅलरी पॅकेज देतो, असे सांगून वारंवार इंटरव्ह्यू करीता कर्नाटक राज्यात बोलावले. तसेच काव्या कन्सल्टन्सीमध्ये नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून अक्षय सातवकडून ५ लाख २० हजार रुपये उकळले. 
 अक्षयने आरोपीकडे नोकरीबाबत तगादा लावला असता आरोपीने तीन वर्षांत अक्षयला नोकरी तर दिलीच नाही उलट उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अक्षय सातव याने या बाबतची तक्रार २१ मार्च रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर नांदुरा पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३१८ / ४ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार विलास पाटील यांनी आरोपीस ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे मिलिंद जवंजाळ, विनायक मानकर, रवी झगरे, आणि सुनील सपकाळ यांच्यावर जबाबदारी सोपवली. या कर्मचाऱ्यांनी कर्नाटकात जावून आरोपी शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी यास बेळगांव जिल्ह्यातील खारमनी या त्याच्या गावातून ताब्यात घेऊन नांदुरा येथे आणले. आरोपीला ३१ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.