Political Exclusive राजकारण समजून घेतांना! विधानपरिषदेची निवडणूक झाली, आता मतमोजणी कशी होणार? विधानसभा, लोकसभेपेक्षा ही मतमोजणी वेगळी कशी?

 पहिल्या पसंतीत आघाडी घेणारा उमेदवारही पराभूत होऊ शकतो? समजून घ्या संपूर्ण गणित...

 
 बुलडाणा (कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत २६ उमेदवार रिंगणात असून एकूण ३२ हजार ६१५ मतदारांनी मतदान केले आहे. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. मात्र, विधानपरिषदेच्या या निवडणुकीची मतमोजणी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे होत नाही. येथे सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार लगेच विजयी ठरत नाही. त्यासाठी विजयाचा ठरावीक कोटा पूर्ण करावा लागतो. नेमकी ही प्रक्रिया काय आहे, ते सोप्या भाषेत समजून घेऊया...

लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेच्या मतमोजणीत फरक काय?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार एका उमेदवाराला मत देतो. मतमोजणीनंतर ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात, तो विजयी घोषित होतो. त्याला एकूण मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे आवश्यक नसते.मात्र, विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघात पसंतीक्रमानुसार मतदान होते. मतदार मतपत्रिकेवर आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर १, दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारासमोर २, तिसऱ्या पसंतीच्या उमेदवारासमोर ३ अशा क्रमाने पसंती नोंदवतो. त्यामुळे मतमोजणीत पहिल्या पसंतीबरोबरच गरज पडल्यास पुढील पसंतींचाही विचार केला जातो. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम वैध मतपत्रिका निश्चित केल्या जातात. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होते. याचवेळी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटाही ठरवला जातो. 

विजयासाठी किती मते लागणार?

या निवडणुकीत ३२ हजार ६१५ मतदान झाले आहे. समजा ही सर्व मते वैध ठरली, तर विजयासाठी १६ हजार ३०८ मतांचा कोटा असेल. मात्र, पसंतीक्रम नोंदवतांना आकडा चुकवणे, खोडतोड होणे अशा कारणांमुळे काही मते अवैध घोषित केली जाऊ शकतात. त्यामुळे एकूण वैध मतांना २ ने भागून आलेल्या उत्तरात १ मिळवून विजयासाठी आवश्यकत असलेल्या मतांचा कोटा निश्चित होतो..अमरावती शिक्षक मतदारसंघाचा विचार केल्यास साधारणतः १५५०० ते १६००० मतांचा कोटा निश्चित होऊ शकतो..अवैध मतांची संख्या वाढल्यास हा आकडा कमी सुद्धा होऊ शकतो.एखाद्या उमेदवाराला पहिल्याच पसंतीत आवश्यक कोटा मिळाला, तर तो विजयी ठरतो. मात्र, कोणत्याही उमेदवाराला हा कोटा मिळाला नाही, तर पुढील पसंतींच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू होते.

पहिल्या पसंतींची सर्वाधिक मते मिळवून विजय नाही..


समजा, सध्याच्या अंदाजानुसार १६३०९ मतांचा विजयी कोटा निश्चित झाला आहे..पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत एका उमेदवाराला १२ हजार, दुसऱ्याला १० हजार आणि तिसऱ्याला ५ हजार मते मिळाली. अशा परिस्थितीत १२ हजार मते मिळवणारा उमेदवार आघाडीवर असला, तरी त्याला लगेच विजयी घोषित केले जाणार नाही. कारण त्याने विजयाचा कोटा पूर्ण केलेला नाही.

मग दुसऱ्या पसंतीची मते कशी मोजणार?

पहिल्या पसंतीत कोणालाही विजयाचा कोटा मिळाला नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला स्पर्धेतून बाद केले जाते. या बाद झालेल्या उमेदवाराला मिळालेल्या मतपत्रिकांवर मतदारांनी दुसरी पसंती कोणाला दिली आहे, हे तपासले जाते. त्यानुसार ती मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात जमा होतात. उदाहरणार्थ, एखादा उमेदवार ५०० मते मिळवून बाद झाला आणि त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील वैध पसंतीनुसार ३०० मते एका उमेदवाराला, तर २०० मते दुसऱ्या उमेदवाराला मिळाली, तर त्या दोघांच्या मतांमध्ये तितकी वाढ होईल.

त्यानंतर पुन्हा मतांची बेरीज केली जाते. कोणी विजयाचा कोटा पूर्ण केला नसेल, तर पुढील सर्वांत कमी मते असलेला उमेदवार बाद होतो. अशा प्रकारे मतांचे हस्तांतरण सुरू राहते.

तिसरी, चौथी पसंतीही महत्त्वाची!

एखाद्या मतदाराने पहिली पसंती दिलेला उमेदवार बाद झाला आणि त्याने दुसरी पसंती दिलेला उमेदवारही आधीच बाद झालेला असेल, तर त्या मतपत्रिकेवरील पुढील वैध पसंती तपासली जाते.
म्हणजेच दुसऱ्या पसंतीचा उमेदवार स्पर्धेत नसेल, तर तिसऱ्या किंवा त्यापुढील पसंतीच्या उमेदवाराला ते मत मिळू शकते. पुढील वैध पसंती उपलब्ध नसेल, तर त्या मताचे हस्तांतरण होत नाही.

पहिल्या क्रमांकावरील उमेदवार मागे पडू शकतो का?

होय! पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत एखादा उमेदवार आघाडीवर असला, तरी इतर उमेदवारांच्या मतांचे हस्तांतरण झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार त्याला मागे टाकू शकतो. त्यामुळे पहिल्या पसंतीची आघाडी म्हणजे अंतिम विजय असे समीकरण येथे नसते.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मत एका उमेदवाराच्या खात्यात मोजले जाते. मात्र, शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघात आवश्यकतेनुसार बाद झालेल्या उमेदवारांच्या मतपत्रिका पुन्हा तपासाव्या लागतात. त्यावरील पुढील पसंतीनुसार मतांचे हस्तांतरण करावे लागते. त्यामुळे मतमोजणीचे अनेक टप्पे होऊ शकतात आणि अंतिम निकाल जाहीर होण्यास अधिक वेळ लागू शकतो.

थोडक्यात सांगायचे तर, विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघात केवळ पहिल्या पसंतीची मते नव्हे, तर मतदारांनी दिलेल्या पुढील पसंतीही निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे २६ उमेदवारांच्या या लढतीत पहिल्या पसंतीची मोजणी झाल्यानंतरही अंतिम निकालासाठी पुढील टप्प्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते...