पोलिसांनी टँकर घेतले ताब्यात ; अवैध बायोडिझेलची वाहतूक की औद्योगिक तेल? चौकशी सुरू...
Jan 16, 2026, 12:08 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुजरात येथून अवैधरित्या बायोडिझेलची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी १५ जानेवारीच्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कारवाई करत एक टँकर ताब्यात घेतला. सदर टँकरमध्ये नेमके बायोडिझेल आहे की अन्य कोणते औद्योगिक तेल, याबाबत महसूल व पोलिस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहर पोलिसांना टँकरद्वारे अवैध बायोडिझेलची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार रात्री सुमारे १.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर सापळा रचून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी टँकर क्रमांक जीजे 18 बी दाबली 8307 हा मुक्ताईनगरकडून खामगावकडे जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर टँकर थांबवून चौकशी केली व पुढील तपासासाठी तो मलकापूर शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आला.
दरम्यान, १५ जानेवारी रोजी सायंकाळी महसूल विभागाच्या पुरवठा अधिकारी धनश्री हरणे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांनी टँकरचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी टँकरमध्ये औद्योगिक तेल (इंडस्ट्रियल ऑईल) असल्याचे सांगण्यात आले असून, त्यासंदर्भातील सर्व वैध पावत्या उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तथापि, सदर द्रवपदार्थ बायोडिझेल आहे की अन्य कोणते तेल, याबाबत निश्चितता करण्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
