मेहकरातील एकांत लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलिसांची धाड; दोन महिलांची सुटका; गोपनीय माहितीवरून मेहकर पोलिसांची धडक कारवाई; कुंटणखाणा चालवणारा आरोपीही जाळ्यात...

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील बायपास परिसरातील एका एकांत लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर मेहकर पोलिसांनी धडक छापा टाकत कुंटणखाण्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. 
 या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना दिनांक १५ मार्च २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, मेहकर बायपासवरील अर्धवट बांधकाम असलेल्या “एकांत हॉटेल अँड लॉजिंग” या इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत एक इसम आर्थिक फायद्यासाठी काही महिलांकडून देहव्यापार करून घेत असून तेथे कुंटणखाणा चालवला जात आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत छाप्यासाठी विशेष पथक तयार केले.
दोन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईपूर्वी पोलिसांनी एक डमी ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. त्यानंतर लॉजची झडती घेतली असता तेथे प्रमोद धनसिंग पवार (रा. बिबी, ता. लोणार) हा इसम आढळून आला. त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन महिला देखील सापडल्या. या प्रकरणी आरोपी प्रमोद धनसिंग पवार तसेच लॉज मालकाविरोधात मेहकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १८३/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५, ६ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोहेकॉ. लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शिवानंद केदार, पो.कॉ. मोहम्मद परसुवाले, करीम शहा, शिवाजी चिम, विनोद फुफाटे, महिला पो.कॉ. आम्रपाली सरकटे तसेच होमगार्ड सचिन इंगळे, संनिल काटकर आणि उमेश देबाजे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, मेहकर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरात कुठेही अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.