मेहकरातील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; देहविक्रय करणाऱ्या दोन महिलांची सुटका; आण्टीसह सहकाऱ्यास अटक...
Oct 17, 2025, 11:23 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :मेहकरसारख्या प्रसिद्ध आणि शांत शहरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान देहविक्रय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, आण्टी आणि तिच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मेहकर शहरातील एका भागात देहविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांमधून समोर आली होती. परिसरातील सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या या प्रकाराबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी पथक तयार करून सापळा रचला.
कारवाईसाठी डमी ग्राहकाची नेमणूक करण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान पथकाने ठिकाणी धाड टाकली. यावेळी एका आण्टीसह तिचा सहकारी रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी दोघेही संबंधित महिलांकडून देहविक्रयाचा व्यवसाय करवून घेत होते.
पोलिसांनी त्या दोन्ही महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या फिर्यादीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ६, आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिला मेहकर शहरात येऊन स्थायिक झाली होती. तिने येथे २३ वर्षीय ऑटोचालकाच्या मदतीने हा कुंटणखाणा सुरू केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत.