दुचाकीवरून देशी दारुची वाहतुक, लाेणार पाेलिसांची दाेघांवर कारवाई; दारुचा माेठा साठा केला जप्त; पेट्रोलिंग करीत असताना दुचाकी केली जप्त...

 
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुचाकीवरून देशी दारुची वाहतुक करणाऱ्या दाेघांना लाेणार पाेलिसांनी १४ ऑक्टाेंबर राेजी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पेट्रोलिंग दरम्यान  लोणी रोड परिसरात करण्यात आली असून, पोलिसांनी दुचाकीसह देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणार येथील एका अधिकृत दारू विक्री दुकानातून देशी दारूचे बॉक्स पोत्यात भरून ग्रामीण भागात विक्रीसाठी नेण्यात येत होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोणार पोलिस स्टेशनचे नायक संजय जाधव आणि पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण हे लोणी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एक संशयास्पद दुचाकीचा पाठलाग करून ती थांबवली.
दुचाकी क्रमांक एमएच 28 बीडी 4432 या वाहनावर देशी दारू ‘भिंगरी’ या ब्रँडच्या १८० मिलिलिटर क्षमतेच्या कंपनी सीलबंद ७२ बाटल्या आढळून आल्या. या दारूचा एकूण साठा ५,७६० रुपये किंमतीचा असून, दुचाकीसह मिळून सुमारे ३५,७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा भगवान मापारी (रा. पिपळखुटा) आणि रमेश सुकलाल बोरकर (रा. अंजनी खुर्द) या दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणार पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, शहरात आणि ग्रामीण भागात सकाळी-सकाळी खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अधिकृत परवानाधारक दारू विक्री दुकानांतून मोठ्या प्रमाणावर दारू बाहेर काढून ती अवैधरित्या विकली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, अशा दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.