खामगावात दाेन सराईत चाेरट्यांना पाेलिसांनी केले गजाआड; ५० हजारांचा एवज केला जप्त; अकाेटातील चाेरीच्या गुन्ह्याच्या लागला छडा...

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव शहर पाेलिसांनी दाेन सराईत चाेरट्यांना गजाआड करून ५० हजार रुपयांचा एवज जप्त केला. या चाेरट्यांना अटक केल्यामुळे अकाेट येथील चाेरीचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले.  
 मंगळवारी दुपारी सुमारास खामगाव शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक एसबीआय बँकेजवळ पेट्रोलिंग करत असताना दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासाअंती त्यांची ओळख सोनू उमाशंकर सिंग ( ३२, रा. राजगड, ता. मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) आणि जिब्राल सनोद गुद्रावल (३०, रा. महात्मा फुलेनगर, टॉवर बिल्डिंग, ठाणे पश्चिम) अशी पटली. पुढील चौकशीत समोर आले की, दोघेही विविध गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच आरोपी आहेत. सोनू सिंग याच्यावर हरसूल व उस्मानपुरा (छ. संभाजीनगर) पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आदी गुन्हे नोंद आहेत. तर जिब्राल गुद्रावल याच्याविरुद्ध वरतकनगर पोलिस ठाण्यात घरफोडी आणि मारहाणीचे गुन्हे नोंद आहेत. दोघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी अकोट (जि. अकोला) येथे ५० हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. अकोट पोलिसांनी याची खात्री केल्यानंतर दोघांना पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, सपोनि भागवत मुळिक, पोहेकाॅ अरुण हेलोडे, प्रदीप मोठे, सागर भगत, राहुल थारकर, गणेश कोल्हे, अमर ठाकूर, रवींद्र कन्नर, अंकुश गुरुदेव आणि राम धामोडे यांनी केली.