पंकज देशमुखांची हत्याच! फोटो पाहून खरं काय ते सगळ्यांना कळेल! मात्र बुलडाणा पोलिस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत?
न्याय हक्क जनआंदोलन समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट! पत्रकार परिषदेत दाखवले फोटो...बातमीत पहा फोटो...
Updated: Jun 24, 2025, 16:06 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :पोलिसांनी ज्या प्रकरणाला आत्महत्या ठरवले, त्यात हत्या झाल्याचा ठोस दावा करत न्याय हक्क जनआंदोलन समितीने आज बुलडाण्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि थेट पुरावे सादर करत पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ३ मे २०२५ रोजी जळगाव जामोद येथे भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पंकज देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी या मृत्यूला ‘आत्महत्या’ असे घोषित केले होते .मात्र देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी ही हत्या असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणात न्याय मागणीसाठी ‘न्याय हक्क जनआंदोलन समिती’ची स्थापना करण्यात आली. आज, २४ जून रोजी या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत सीआयडीमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी केली. त्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समितीने अनेक खळबळजनक आरोप केले.
हे फोटो सांगतात,आत्महत्या नाही...हत्याच....

पत्रकार परिषदेत प्रसेनजीत पाटील यांनी थेट मृतदेहाचे फोटो सादर करत पोलिसांच्या निष्क्रीयतेवर घणाघात केला. त्यांनी सांगितले की, “गळफास घेतल्यास शरीराची स्थिती वेगळी असते. मात्र पंकज देशमुख यांच्या मान मागील बाजूस झुकलेली आहे, त्यांचे पाय जमिनीला टेकलेले होते. हातापायावर स्पष्टपणे मारहाणीचे व चटके दिल्याचे खुणा आहेत. त्यांचे बोटे मोडलेली आहेत. या सगळ्या बाबीवरून ही हत्याच असल्याचे स्पष्ट दिसते असे पाटील म्हणाले..
तपास प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत पाटील म्हणाले की, “पोस्टमार्टम जळगाव जामोदमध्ये न करता अकोल्यात का करण्यात आले? पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणात तातडीने आत्महत्येचा निष्कर्ष का काढला?” असा सवालही त्यांनी केला.
"जळगाव जामोदमध्ये कोणाचा दबाव?
या मृत्यूमागे जळगाव जामोदमध्ये एक आका असल्याचे पाटील म्हणाले. “संपूर्ण गावाला माहित आहे की ही आत्महत्या नाही, तरीही पोलिस याकडे डोळेझाक का करत आहेत? पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा सवालही त्यांनी केला..
या पत्रकार परिषदेला समितीच्या प्रमुख जयश्रीताई शेळके, स्वातीताई वाकेकर, शिवसेनेचे वसंतराव भोजने, प्रकाश अवचार पाटील यांच्यासह पंकज देशमुख यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.