पंकज देशमुख यांचा मृत्यू ‘घातपात’; आत्महत्या नव्हे – प्रसेनजीत पाटील यांची सीआयडी चौकशीची मागणी
Jun 4, 2025, 13:01 IST
जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दि.३ जून:
भाजपा कार्यकर्ते व शासकीय कंत्राटदार पंकज देशमुख यांचा ३ मे रोजी झालेला मृत्यू हा आत्महत्या नसून घातपातच आहे, असा ठाम आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे.
स्थानिक बाजार समितीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, "पंकज देशमुख एक धाडसी आणि संघर्षशील व्यक्ती होते. आर्थिक संकटावर मात करून त्यांनी कोट्यवधी रुपयांची ठेकेदारी उभी केली होती. असे व्यक्तिमत्व आत्महत्या करेल हे विश्वासार्ह नाही."
पाटील यांनी मृतकाची पत्नी सुनीता देशमुख यांच्या तक्रारींचा उल्लेख करत सांगितले की, मृत्यूच्या दिवशी पंकज यांच्या गळ्यात दुपट्टा आढळल्याची बाब संशयास्पद आहे, कारण पंकज कधीच गळ्यात अशा प्रकारचे कपडे वापरत नसत. शिवाय, शरीरावरील जखमा, मोडलेली बोटे आणि अन्य परिस्थितिजन्य बाबी या मृत्यूच्या भोवतालचे गूढ वाढवणाऱ्या आहेत.
पोलिस तपासाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "ठाणेदार श्रीकांत निचड योग्य माहिती देत नाहीत, तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेवर मृतकाच्या पत्नीचा विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच या प्रकरणाचा तपास पोलीस दबावाखाली न करता स्वतंत्र यंत्रणा – सीआयडी कडे सोपवणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
प्रसेनजीत पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की, "जर याबाबत न्याय मिळाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. पंकज देशमुख यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जर योग्य तपास झाला नाही, तर उद्या आणखी एखाद्या कार्यकर्त्याची अशीच अवस्था होईल."
सुनीता देशमुख आणि कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.